पाकिस्तानचा दूतावास बंद करण्याचा आदेश   

नागरिकांना देश सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगामच्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने  बुधवारी कठोर पावले उचलली आहेत. त्या अंतर्गत भारतातील पाकिस्तानी दूतावास आणि अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यासाठी व्हिसा कायमचा बंद केला असून, भारतात सध्या राहात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पुढच्या ४८ तासांत देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सीसीएस म्हणजेच कॅबिनेट सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक काल पार पडली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. बैठक जवळपास तीन तास सुरु होती. या बैठकीनंतर पररराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेतली. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सीसीएसच्या बैठकीत पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

सिंधू जल करार स्थगित

केंद्र सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार देखील स्थगित केला आहे. भारतातील पाकिस्तानी दुतावास बंद करण्याबरोबरच पाकिस्तानच्या उच्च आयुक्तालयाच्या पाच अधिकार्‍यांना देश सोडण्यास सांगितले.
 

Related Articles